गडचिरोली - जिल्ह्यात कोरोना लसीकरणाबाबत तीन ठिकाणी पुर्वतयारी म्हणून यशस्वी प्रात्यक्षिक घेण्यात आले. कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग लसीकरण असून त्याकरीता पुर्वतयारी सुरु झालेली आहे. जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र बोदली, ग्रामीण रूग्णालय धानोरा येथे कोविड लसीकरण प्रात्यक्षिक करण्यात आले.
सर्व प्रक्रियांचे प्रात्यक्षिक पूर्ण -
जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी लसीकरण प्रात्यक्षिकाची प्रत्यक्ष पाहणी करुन आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्येक ठिकाणी 25 आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले व त्यांच्यासोबत प्रात्यक्षिक पुर्ण केले. यावेळी लसीकरणाचा डोस देणे वगळता सर्व प्रक्रियांचे प्रात्यक्षिक पूर्ण करण्यात आले.
एका दिवसात 100 लोकांना लस -
येणाऱ्या काही प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यावेळी एका लसीकरण बुथवर 100 लोकांना एका दिवसात लस दिली जाणार आहे. सुरुवातीला जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. आज झालेल्या प्रात्यक्षिकांमध्ये प्रत्यक्ष लस टोचणे सोडून सर्व प्रकारचे प्रात्यक्षिके पूर्ण करण्यात आली. या लसीकरण कक्षात सॅनिटायझर, प्राथमिक तपासणी, नोंदणी, प्रतिक्षा कक्ष, प्रत्यक्ष लसीकरण कक्ष व देखरेख कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. त्याची तयारी यावेळी करण्यात आली.
चार टप्प्यात मिळणार लस -
प्रत्यक्ष लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस, अग्नीशमन दल, महसूल यंत्रणा आदी विभाग, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील पूर्व व्याधींग्रस्त नागरिक आणि चवथ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्ष लसीकरणासाठी जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असून सर्व जण एक टीम म्हणून काम करणार आहेत.
हेही वाचा - "माझा छळ का होतोय? मला देशाकडून उत्तर हवंय", कंगनाचे जनतेला आवाहन