गडचिरोली - आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. विधानसभा निवडणुकी दरम्यान आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
हे ही वाचा - आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार - जिल्हाधिकारी दौलत देसाई
विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर असून, ५ तारखेला छाननी होईल. ७ ऑक्टोबर ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २१ ऑक्टोबरला मतदान व २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. शनिवार २१ सप्टेंबर पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. या काळात ठिकठिकाणी लागलेले राजकीय बॅनर व पोस्टर्स काढून घेण्यात येतील. प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात येणार नाही. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शेखर सिंह यांनी सांगितले.
हे ही वाचा - समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या भाजपला 'चले जाव' म्हणायची वेळ - शरद पवार
जिल्ह्यात ४०५० मतदान कर्मचारी राहणार असून, त्यांचे प्रशिक्षण २६, २७ व २८ सप्टेंबरला आयोजित करण्यात आले आहे. हे कर्मचारी दुर्गम भागातही काम करतील. त्यांचा भत्ता वाढवावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मतदान प्रक्रिये दरम्यान गैरहजर राहणाऱ्या व मद्य प्राशन करुन येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सिंह यांनी सांगितले. जिल्ह्यात २२३२ दिव्यांग मतदार असून, त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी व युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येणार असल्याची माहितीही सिंह यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ उपस्थित होत्या.
हे ही वाचा - नागपूर विभाग : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ?