गडचिरोली - देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जेसामल मोटवानी यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोटवाणी हे रविवारी गडचिरोली जिल्ह्याची सीमा ओलांडून भंडारा जिल्ह्यात जात असताना लाखांदूर मार्गांवरील सोनी येथील तपासणी नाक्यावर देसाईगंज पोलीस, महसुल विभाग, नगरपरिषद व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोटवानी व त्यांच्या वाहन चालकाला चौकशीकरता वाहन थांबविण्यास सांगितले. परंतु, चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. हे कृत्य संचारबंदी कायद्याचे उल्लंघन असल्याने मोटवानी यांच्यासह त्यांच्या वाहनचालकावर देसाईगंज पोलिसांनी भादंवि कलम १८८, २७९, ३४ व एनव्ही अॅक्ट १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जेसामल मोटवानी हे राजकीय नेते आहेतच शिवाय किराणा व कापड व्यावसायिकही आहेत. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी त्यांनी अनेकदा मुंबई, दिल्ली व नागपूरची वारी केली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या ठिकाणाहून आल्यानंतरही ते गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकांना भेटले होते. परंतु, त्यांनी कुणालाही याविषयी माहिती दिली नव्हती. त्यांच्यासमवेत ३ राईसमील मालकही होते, अशी चर्चा त्यावेळी सुरू झाली. ही बाब कळताच त्यांना होम क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच मोटवानी हे ३ एप्रिलला देसाईगंज शहरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आर्थिक व्यवहारासाठी गेले होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर काही जागरुक नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. शिवाय ७ एप्रिलला मोटवानी व काही राईसमील मालक गडचिरोली येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनाही भेटले होते.
या प्रकरणाची चौकशी देसाईगंज नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ४ एप्रिलला सुरू करुन याविषयीचा संपूर्ण अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला. हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. त्यावरची कार्यवाही बरेच दिवस होऊनही प्रलंबित आहे. हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला कोणताही व्यक्ती खुलेआम फिरत असेल, तर त्याच्यावर नियंत्रण कुणाचे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.