गडचिरोली - निरोगी आरोग्यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी, यासाठी समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या सर्च संस्थेद्वारे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अतिदुर्गम अशा टविटोला गावातील 40 युवकांनी सहभाग घेत निरोगी आरोग्याचा संदेश दिला.
खेळाच्या माध्यमातून आदिवासी युवक युवतींचे संघटन बळकट व्हावे. तसेच त्यांचे आरोग्य सुधारून रिकामा वेळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी खर्ची व्हावा. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्च संस्थेद्वारे डॉ. के व्ही. चारी यांच्या स्मृतीत आदिवासी युवक युवतींसाठी व्हॉलीबॉल व कबड्डी सामन्यांचे आयोजन प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावांमध्ये केले जाते. यंदा टविटोला या गावात ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. खेळासोबतच युवक युवतींनी नियमीत व्यायाम करणे आवश्यक आहे. हा संदेश युवकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘धावा आपल्या आरोग्यासाठी’ उपक्रमांतर्गत १० किमी मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धा घेण्यात आली.
डॉ. राणी बंग यांनी हिरवी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. ४० युवक युवतींनी यात सहभाग घेत निरोगी आयुष्यासाठी धावणे आवश्यक असल्याचा संदेश दिला. स्पर्धेत युवक गटात प्रथम क्रमांक पवनी येथील धनिराम पदा, द्वितीय क्रमांक पवनी येथीलच कार्तिक गावडे तर तृतीय क्रमांक गिरोला येथील अंकित रडके याने पटकावला. युवतींच्या गटात प्रथम क्रमांक उडेगाव येथील पल्लवी मडावी, द्वितीय क्रमांक माळंदा येथील अश्विनी पदा तर तृतीय क्रमांक पवनी येथील शुभांगी किरंगे हिने पटकावला.