गडचिरोली - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. परिणामी गरीब गरजूंची मोठी फरफट होणार आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील साल्हे ग्रामसभेने सामुहिक खात्याच्या रक्कमेतुन गावातील 54 कुटुंबाना दैनंदिन जिवनाश्यक वस्तु खरेदी करुन दिले.
प्रत्येक कुटूंबाला 5 लीटर खाद्य तेल, 2 किलो कांदे,1 किलो मिरची पूड, अर्धा किलो हळद, 2 किलो तुर दाळ याप्रमाणात वाटप करण्यात आले. तांदुळ सध्या रेशन दुकानातून सर्वांना मिळत आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत सगळ्याकडे तांदळाची व्यवस्था असल्याचे चर्चेद्वारे लक्षात आले. परंतु जिवनाश्यक वस्तु खरेदी करण्यास सगळ्याच कुटुंबाकडे पैसा नाही. या दिवसामध्ये रोजगार हमीमुळे हाताला काम मिळत होते. यातून मिळालेल्या पैशाने दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सर्वसाधारण कुटुंबांची सोय व्हायची.
लॉकडाऊनमुळे गंभीर समस्या निर्माण झाली. ही बाब लक्षात घेता ग्रामसभेतील अध्यक्ष चमरु होळी, सचिव दलसाय गोटा सामाजिक कार्यकर्ते इजामसाय काटेंगे, झाडूराम हलामी, पोलीस पाटील समशिला कुमरे, गावपुजारी मेहरू गोटा यांनी बसून निर्णय घेतले. गृहभेटीद्वारे चर्चा करून सर्व कुटूंबाना समजावून सांगण्यात आले. सगळ्यांसोबतच्या चर्चेनंतर विचारांने ग्रामसभेच्या निधीमधून जिवनाश्यक वस्तु गावात आणुन सामाजिक अंतर ठेवून साहित्य वाटण्यात आले.