गडचिरोली - जिल्ह्यातील कोरची, धानोरा, कुरखेडा तालुक्यात मिठाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. 25 किलोची दीडशे रुपयांची मिठाची बॅग साडेतीनशे रुपयांना विकली जात आहे. मिठाच्या तुटवड्याने नागरिक घाबरले असून मीठ खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. अशातच जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी काही तालुक्यांमध्ये मिठाचा तुटवडा असल्याची चुकीची अफवा पसरली असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही. मोठ्या प्रमाणात मीठसाठा उपलब्ध आहे, असे बुधवारी स्पष्ट केले आहे.
कुरखेडा, कोरची व धानोरा तालुक्यांमध्ये काही लोकांकडून चुकीची अफवा पसरवण्यात आली असून जिल्ह्यांमध्ये मुबलक स्वरुपात मीठाचा साठा उपलब्ध आहे. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत किंवा जास्तीचे पैसे देऊन मीठ खरेदी करू नये. अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी मीठ खरेदी केल्यामुळे संबंधित तालुक्यात मीठ संपल्याचे समोर आले आहे. मात्र, जिल्ह्यात मीठाचा मुबलक साठा असून अकारण मीठ खरेदी करून साठा करू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. अफवांमुळे अचानक वाढलेली मागणी व बाजारपेठेत मिठाची झालेली कृत्रिम टंचाई याबाबत प्रशासनाने दखल घेतली असली तरी नागरिक मीठ खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.