गडचिरोली - जिल्ह्यातील 460 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज 8 फेब्रुवारी रोजी सर्व तहसील कार्यालयामध्ये पार पडली. यामध्ये काही उमेदवार सरपंच पदाचे स्वप्न पाहत असताना आरक्षण न निघाल्याने पुरता हिरमोड झाल्याचे चित्र दिसून आले.
काही ठिकाणी आरक्षण न निघाल्याने अनेकांचा हिरमोड-
गडचिरोली जिल्ह्यातील 460 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. यामध्ये 20 ग्रामपंचायती अविरोध झाल्या. 440 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला पहिल्या टप्प्यात तर 20 जानेवारीला दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. तर 22 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. मतमोजणी होऊन पंधरा दिवसाचा कालावधी लोटला. मात्र सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली नव्हती.
त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये निराशा होती. अखेर ही निराशा आज मिटली. बाराही तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. काही ठिकाणी आरक्षण न निघाल्याने अनेकांचा हिरमोड झाला.