गडचिरोली - बांधकाम ठेकेदार, तेंदूपत्ता ठेकेदार, सामान्य नागरिक यांच्याकडून खंडणी वसूल करून ती रक्कम देशविघातक कृत्याच्या वापरासाठी नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 15 लाख 96 हजार रुपयांची रक्कम गडचिरोली पोलिसांच्या हाती लागली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्यही जप्त करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान 1 जुलै गुरूवारला एटापल्ली तालुक्यातील कुदरी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत होते. तेव्हा जमिनीत पुरलेली रक्कम आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आढळून आले. सापडलेली रक्कम 15 लाख 96 हजार एवढी असून यामध्ये केवळ दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा समावेश आहे.
'हे' साहित्य करण्यात आले जप्त
स्फोटक साहित्यामध्ये चार इलेक्ट्रिक बटन, एक स्वीच, तीन नग डेटोनेटर, दोन वायर बंडल, एक वॉकीटॉकी, नक्षल बॅनर व इतर साहित्यांचा समावेश आहे. सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले असून ते साहित्य गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आहे. जिल्ह्यात नेहमीच नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवाई केल्या जात असून अनेक ठेकेदार, कंत्राटदारांचे खंडणीसाठी खून केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच खंडणी वसूल करून नक्षलवाद्यांनी रक्कम जमिनीमध्ये पुरून ठेवली होती. मात्र ती रक्कम पोलिसांच्या हाती लागल्याने नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करून ही रक्कम कोणाकडून वसूल करण्यात आली, याचा शोध घेतले जाणार आहे. सध्या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख हे उपस्थित होते.