गडचिरोली - छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या पेरमिली भट्टी जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये ५ जहाल नक्षलवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पळून जात होते, मात्र C-60 कमांडोंनी नक्षलवाद्यांचा पाठलाग करून 5 जहाल नक्षलवाद्यांना ताब्यात घेतले.
उपविभाग भामरागड हद्दीत येणाऱ्या उप पोलीस स्टेशन लाहेरीपासून अंदाजे ३५ किमी अंतरावर असलेल्या पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. तेव्हा लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला असता, यावेळी पोलिसांनीही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला.
चकमक सुरू असताना पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून जाण्याचा जाऊ लागले. त्यावेळी सी-६० कामांडोनी नक्षलवाद्यांचा पाठलाग करुन ५ जहाल नक्षलवाद्यांना पकडले. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये रैणू सोनू वड्डे (वय २० वर्षे, रा.पदमकोट ता.कोहकामेटा जि. नारायणपूर), बंडू चक्कु वड्डे (वय २५ वर्षे रा.रा.पदमकोट ता.कोहकामेटा जि. नारायणपूर), सुखराम सोमा उसेंडी (वय ४० वर्षे रा. उसेवाडा ता.कोहकामेटा जि. नारायणपूर) इरपा उसेडी (वय ३० वर्षे रा. उसेवाडा ता.कोहकामेटा जि. नारायणपूर), केये सायबी वड्डे (वय ४० वर्षे रा.पदमकोट ता.कोहकामेटा जि. नारायणपूर) सर्व राहणार छत्तीसगड यांचा समावेश आहे.
अटक केलेल्या ५ नक्षलवाद्यांमध्ये २ नक्षलवादी कुटूल एरिया दलम सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर ३ नक्षलवादी जन मिलीशीयांशी संबंधीत होते. अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून ३ हत्यारे व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या नक्षलवाद्यांविरोधात उपपोलीस स्टेशन लाहेरी येथे गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील करत आहेत.