गडचिरोली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वच प्रमुख मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच गस्त घालून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.
हे वाचलं का? - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; 32 लाखांचे होते बक्षीस
येत्या २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे अंमली पदार्थ तसेच पैशांची आयात होऊ नये यासाठी महामार्गांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे या क्षेत्रातील भामरागड-आलापल्ली मार्गावर निवडणूक पथक तसेच पोलिसांनी गस्त घालणे सुरू केले आहे.
हे वाचलं का? - नक्षल चळवळीला हादरा; गडचिरोली पोलिसांसमोर ६ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
निवडणुकीत दारू तसेच पैशांचा वापर होऊ नये. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभाग तसेच पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहेत. अहेरी निर्वाचन क्षेत्राअंतर्गत भामरागडसह सिरोंचा आलापल्ली, एटापल्ली, मुलचेरा या प्रमुख मार्गांवर तपासणी मोहीम सुरू केली आहे.