गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुका मुख्यालयात राज्यातील एकमेव पंचायत समितीच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे. मात्र, पंपावर कार्यरत शासकीय कर्मचाऱ्याचा काम करण्यास नकार व उधारीच्या पेट्रोल विक्रीतून तोटा सहन करावा लागत असल्याने सदर पेट्रोल पंप भाड्याने देण्याचा ठराव पंचायत समितीने घेतला आहे. त्यामुळे लवकरच या पेट्रोल पंपाचे खासगीकरण होणार आहे.
जंगल व्याप्त असलेल्या एटापल्ली तालुका निर्मितीला 20 वर्षाचा काळ लोटला. मात्र, या तालुक्यात एकही पेट्रोल पंप नव्हता. येथील दुचाकी व चारचाकीस्वारांना पेट्रोल व डिझेलसाठी 20 किलोमीटर आलापल्ली येथे जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेता पंचायत समितीच्या तत्कालीन सभापती सपना कोडापे व उपसभापती केवल अतकमवार यांनी पाठपुरावा करून 2005मध्ये पंचायत समितीच्या मालकीचा पेट्रोल पंप मंजूर करून घेतला. मागील पंधरा वर्षापासून सदर पेट्रोल पंप व्यवस्थित सुरू आहे. या पेट्रोल पंप व्यतिरिक्त तालुक्यात इतर कुठेही पेट्रोल पंप नाही. मागील काही वर्षात तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे या पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी असते. दर महिन्याला सरासरी पंधरा ते वीस टँकर पेट्रोल व डिझेलचा खप या पंपावरून होत असते. यामुळे पंचायत समितीलासुद्धा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, अचानक सदर पेट्रोल पंप भाड्याने देण्याचा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी घेतला. या ठरावाला महिना लोटला असला तरी अद्यापही कोणत्याही कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेले नाही.
पंपाचा हिशेब ठेवण्यासाठी एका शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र नियमानुसार आठवड्यातील सातही दिवस पेट्रोल पंप सुरू असते. तेव्हा शासकीय कर्मचारी सातही दिवस हजर राहण्यास नकार देत आहे. तर नव्या, नियमानुसार शनिवार व रविवार सुट्टी असल्याने या दोन दिवशी देखरेख करण्यास कर्मचारी नसतो. अशा अनेक अडचणी येत असल्याने सदर पेट्रोल पंप भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय पंचायत समितीने घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे या पेट्रोल पंपावर काही राजकीय पुढारी पेट्रोल व डिझेल उधार देण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात. वेळप्रसंगी भांडणसुद्धा करतात. पेट्रोल कंपन्या पेट्रोल मालकाला एक दिवसाच्या उधारीवर टँकर पाठवत नाही. अशा स्थितीत पेट्रोल-डिझेल उधार दिले जात असल्याने आर्थिक नियोजन बिघडले आहे. काही राजकीय पुढाऱ्यांनी तर पेट्रोल-डिझेलचे पैसेसुद्धा बुडवल्याची शहरात चर्चा आहे.