गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील येलदडमी जंगल परिसरात नक्षल व सी-60 जवानांमध्ये शुक्रवारी (दि. 3 जुलै) सायंकाळी चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यास जवानांना यश आले. शनिवारी (दि. 4 जुलै) मृत नक्षलवाद्याची ओळख पटली असून तो पेरमिली दलमचा कमांडर सोमा उर्फ शंकर असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. ठार झालेल्या शंकरवर गंभीर स्वरूपाचे 15 गुन्हे असल्याने शासनाने त्याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
एटापल्ली तालुक्यातील उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या येलदडमी जंगल परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 कमांडोनी घातपाताच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांचा शिबीर उध्वस्त केले. या जंगल परिसरात सी-60 कमांडोंनी शोधमोहीम राबविली असता एक हत्यार, 2 प्रेशर कुकर, वायर बंडल, 2 वॉकीटॉकी, कॅमेरा फ्लॅश, 20 पिटु असा मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त आढळून आले. ही चकमक सुमारे अर्धा तास चालली होती. चकमकीनंतर सी-60 कमांडोचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता.
आज शनिवारी मृत नक्षलवाद्यांची ओळख पटली असून, ठार झालेला नक्षलवादी हा पेरमिली दलमचा कमांडर कोटे अभिलाष ऊर्फ चंदर ऊर्फ शंकर ऊर्फ सोमा (वय 36 वर्षे) आहे. तो तेलंगणा राज्याच्या मुलुगु जिल्ह्यातील कारापल्ली रहीवासी होता. तो 2008-9 मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला होता. सन 2012-13 पासून तो गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होता. सन 2018-19 पासुन तो पेरमिली दलम कमांडर म्हणून कार्यरत होता. पेरमिली दलम कमांडर सोमा ऊर्फ शंकर याच्यावर गडचिरोली पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत एकुण 15 गुन्हे दाखल असून यात खुनाचे 5 गुन्हे, चकमकीचे 5 गुन्हे, विविध जाळपोळीचे 3 गुन्हे, दरोड्याचा 1 व इतर एक असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
शासनाने त्याच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या जहाल नक्षलवाद्यास कंठस्नान घालणाऱ्या बहादुर सी-६० कमांडोजच्या शौर्यपुर्ण कामगिरीचे कौतुक केले असून या बहादुर जवानांना रोख पारितोषीक जाहीर केले आहे.
हेही वाचा - फ्रिजवाल गायी वाटप घोटाळ्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल ; 53 गायी जप्त