गडचिरोली - कोरोना महामारीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मात्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार 23 नोव्हेंबर 2020पासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरवण्यास परवानगी देण्यात आली. आता वर्ग सुरू होऊन दीड महिना उलटला आहे. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थितीचे प्रमाण केवळ 30 टक्के असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
एकही विद्यार्थी कोरोनाबाधित नाही
गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे 295 शाळा आहेत. यापैकी covid-19 नियमाचे पालन करत 286 शाळा सुरू करण्यात आल्या. सर्व माध्यमिक शाळांची नववी ते बारावीची एकूण विद्यार्थी संख्या 16 हजार 550 इतकी आहे. मात्र सद्यस्थितीत केवळ 16 हजार 400 विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दीड महिन्यापासून विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र दीड महिन्याच्या कालावधीत एकही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळलेला नाही. ही एक समाधानकारक बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही कमी होत असल्याने व रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नव्या वर्षात विद्यार्थ्यांची उपस्थितीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
कोविड नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना धडे
गडचिरोली जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या 295 शाळा आहेत. यापैकी 280 शाळा सुरू करण्यात आले आहेत. या शाळेमध्ये 46 हजार 550 विद्यार्थीसंख्या असून सध्या तेथे 16, 400 विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. सुरू करण्यात आलेल्या सर्व शाळांमध्ये ऑक्सीमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर अशा अनेक गोष्टींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहे.