गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत असलेल्या कुंडुम जंगलात आज सकाळी ९ च्या सुमारास सी-६० पथकाचे जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांना कुठलीही हानी झाली नाही. परंतु, घटनास्थळी आढळलेल्या पिट्टू, शस्त्रे व अन्य साहित्यावरुन या चकमकीत काही नक्षली जखमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सी-६० पथकाचे जवान कुंडुम परिसरातील जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे २५ ते ३० पिट्टू, डेटोनेटर, कॅमेरा, फ्लॅश, मल्टीमीटर व अन्य नक्षल साहित्य आढळून आले. यावरुन काही नक्षली जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.