गडचिरोली - भामरागड तालुक्यातील कुंडुरवाहीच्या जंगलात आज सकाळी पोलीसांचे एक पथक अभियानावर होते. त्यावेळी नक्षल्यवाद्यांनी भूसुरुंगस्फोट घडवून आणत पोलीस पथकावर हल्ला केला. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यात दोन महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, विविध स्वरुपाचे गुन्हे असल्याने या दोन्ही नक्षलवाद्यांवर २० लाख रुपयांचे बक्षीस होते.
गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवान व अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयातील पोलीस जवान संयुक्तरित्या भामरागड तालुक्यातील जंगलात नक्षल मोहीम राबवत होते. सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास गुंडूर्वाही आणि पुलनार गावाच्या पहाडीवरील झरणाजवळ नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यामध्ये पोलीस दलाला कुठलीही हानी पोहोचली नाही. या परिसरात शोधमोहीम राबवत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या चकमकीतनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले.
चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावर शोध मोहीम राबवली असता २ महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. डीव्हीसी कमांडर रामको नरोटी आणि शिल्पा दुर्वा, असे ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे नावे आहेत. ११ एप्रिलला मतदान प्रक्रियेदरम्यान एटापल्ली तालुक्यातील वांगेझरी येथे घडलेल्या भूसुरुंग स्फोटात या दोघींचाही सहभाग होता. रामकोवर १६ लाखांचे, तर शिल्पावर ४ लाखांचे बक्षीस होते. रामको ही नक्षलवादी नेता भास्करची पत्नी आहे.
चकमक संपताच गडचिरोली पोलीस मुख्यालयातून पोलिसांच्या मदतीला हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या दोन्ही महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह गडचिरोली येथे आणून शवविच्छेदन करण्यात आले. नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी सी-६० पथक आणि पोलीस जवान सक्षम आहेत. घटनास्थळी शोध मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.