गडचिरोली - केंद्र सरकारने पारित केलेले नागरिक दुरुस्ती विधेयक मुस्लीम समाजाच्या विरोधी आहे. त्यामुळे हे विधेयक राष्ट्रपतींनी नामंजूर करावे, अशी मागणी देसाईगंज येथील मुस्लिम समाज बांधवांनी उपविभागीय अधिकाऱ्यां मार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात देसाईगंज येथील अल्पसंख्यांक समाजाच्या नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा गडचिरोलीच्या वतीने या विधेयकाविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे समाजात तेढ निर्माण करणारे तसेच मुस्लिम समाज विरोधी असल्याचे म्हटले आहे. नागरिक दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींनी नामंजूर करावे, असे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यां मार्फत राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.
काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल लतीफ रीजवी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आरिफ खानानी, वहीद शेख, सुनील शहारे, लतीफ शेख , जावेद कूरेशी, शेरू कुरेशी, चांद कुरेशी, शरीफ खान, बबलु शेख आदींनी हे निवेदन सादर केले.