गडचिरोली - कडक उन्हाळा आणि आंबा पर्व हे समीकरणच आहे. याच काळात खवय्यांना उत्तम आंबे चाखायला आणि अभ्यासायला मिळावे यासाठी गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्र सोनापुरने शुक्रवारी आंबा महोत्सवाचे आयोजन केले. यात हजारो शेतकऱ्यांनी आंबा महोत्सवात आंब्यांचा स्वाद अनुभवला.
कलेक्टर, सीईओ, सरपंच, आबा, इमामपसंद, जहांगीर, आम्रपाली, नागीन, सीता की सहेली.. ही व्यक्तींची अथवा पदांची नावे आहेत. पण गडचिरोलीत सध्या सुरू असलेल्या आंबा महोत्सवात अशा सारख्या अनेक आंब्याच्या जातींचे प्रदर्शन सुरू आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र सोनापूरच्या वतीने आंबा उत्पादकांना चालना देण्यासाठी आणि बाजारपेठ विकसित करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सुमारे १०० हून अधिक आंबा उत्पादकांनी यात सहभाग घेतला.
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आंबा उत्पादनात आवड असलेल्या शेतकऱयांसाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले. विशेष म्हणजे गडचिरोलीतील तब्ब्ल ४० विविध जातींच्या आंब्याचे महोत्सवात प्रदर्शन केले गेले. गडचिरोली ही नैसर्गिक आणि रसायनमुक्त आंब्याची बाजारपेठ म्हणून विकसित व्हावी, हा यामागचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. दरम्यान गडचिरोलीत विविध बाजारात आंब्याला चांगला भाव मिळत नसला तरी ज्यांना रसायनयुक्त आंब्याची चव माहीत आहे ते खवय्ये दरवर्षी आठवण ठेऊन आंब्याच्या पेट्या मागवत आहेत. प्रदर्शनात आंब्याची आवक कमी असला तरी योग्य भाव मिळत असल्याचे मत आंबा उत्पादकांनी व्यक्त केले.