गडचिरोली - कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार(26 Naxal Killed in Gadchiroli) केले आहे. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत(Gadchiroli Naxal Encounters) नक्षलविरोधी पोलीस पथकाचे चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ले सुरूच असतात. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात झालेल्या चकमकींचा 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...
गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकींचा आढावा
- 13 नोव्हेंबर 2021 -
धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवादी(26 Naxals killed) ठार झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.
- 28 एप्रिल 2021 :
एटापल्ली तालु्क्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. गट्टा-जांबिया जंगलात गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती.
- 28 मार्च 2021 :
28 मार्चला झालेल्या चकमकीत पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. ही चकमक कुरखेडा जिल्ह्यातील खोब्रामेंढा परिसरात झाली होती. या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईच्या सी -60 कमांडोंच्या नेतृत्वात ही कारवाई झाली होती.
- 18 ऑक्टोबर 2020:
जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पथकाच्या (एएनएस) कमांडोने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-माओवादी (सीपीआय-माओवादी)च्या पाच नक्षलवाद्यांना ठार केले होते. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता. कोस्मी-किस्लेनी जंगलात ही कारवाई करण्यात आली होती.
- 2 मे 2020:
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-माओवादी (सीपीआय-माओवादी)च्या एका वरीष्ठ महिला कमांडरचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. पेंढरा भागातील सिनभट्टी जवळ ही कारवाई करण्यात आली होती.
- 15 मे 2019:
या चकमकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-माओवादी (सीपीआय-माओवादी)च्या दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला गेला. तर या चकमकीत ५ जण जखमी झाले होते. नरकासा भागात सुरक्षा दलाने ही कारवाई केली होती.
- 27 एप्रिल 2019:
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-माओवादी (सीपीआय-माओवादी)च्या दोन महिला नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले होते. यापैकी एका महिलेवर 18 लाख रुपयांचे बक्षिस होते. ही कारवाई भामरागड तालुक्यातील कोटी गावाजवळ करण्यात आली होती.
- 28 फेब्रुवारी 2019:
या चकमकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-माओवादी (सीपीआय-माओवादी)च्या आठ जणांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये पाच महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता.
- 22 एप्रिल 2018 :
या चकमकीत 37 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यापैकी 16 जणांची ओळख पटली होती. यापैकी काही नक्षल्यांवर एकूण 1.6 कोटी रुपयांची बक्षिसे होती.
- 6 डिसेंबर 2017:
या चकमकीत पाच महिलांसह सात नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले. ही चकमक सिंरोचा तालुक्यातील झिंगानूर भागात झाली होती.
- 18 फेब्रुवारी 2014:
या चकमकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-माओवादी (सीपीआय-माओवादी)च्या सात नक्षलवाद्यांचा महाराष्ट्र पोलिसांनी खात्मा केला होता. ही चकमक अलिटोला गावाजवळ घडली होती.