गडचिरोली - लहानपणापासून गणपती बाप्पावर असीम श्रध्दा. या श्रद्धेपोटी प्रत्येक दगडात बाप्पाला शोधण्याचा छंद आणि या छंदामुळे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल दहा हजार गणपती मूर्तींचा अनोखा संग्रह महाराष्ट्र भूषण, सर्च शोधग्रामच्या संचालिका डॉ. राणी बंग यांच्याकडे बघायला मिळतो. हा अनोखा संग्रह आहे तरी काय हे जाणून घेऊयात ईटीव्ही भारतच्या या खास रिपोर्टमध्ये...
अमेरिकेतही गणपतीची पूजा -
बालमृत्यू आणि दारूबंदीच्या आंदोलनासाठी गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव येथील 'सर्च शोधग्राम'चे संचालक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे नाव अगत्याने घेतले जाते. राज्य शासनाने बंग दाम्पत्यांना महाराष्ट्र भूषण म्हणून गौरविले आहे. मात्र, या पलीकडेही डॉ. राणी बंग यांनी आपल्या छंदातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या सांगतात, विविधतेत एकता असून त्याचे प्रतिबिंब गणपतीत दिसते. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे बाप्पा प्रतीक आहे. अमेरिकेत अनेक प्रांतात शेतकऱ्यांचा बाजार असतो. तिथे ते स्वतःचा शेतमाल विकतात. तिथे गणपतीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. लाफेंड बुध्दा किंवा इतर मूर्ती घरात ठेवतात तसे भारताच्या पलीकडे एलीफेंट गॉड म्हणून गणपतीची पूजा केली जाते. तसी मूर्ती ठेवली जाते, असे डॉ. राणी बंग यांनी सांगितले.
सर्च रुग्णालयात हजारो बाप्पांचा संग्रह -
लहानपणापासूनच माझ्या घरी दहा दिवस गणपती विराजमान असतात. सार्वजनिक गणेशाची सर्चमध्ये स्थापना होते. गणपतीची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा आहे. सगळे फूल, पाने याचा वापर पूजेत होतो. बाप्पाच्या जन्माची जी कथा आहे. त्यानुसार पहिले तर स्री शक्तीचा मोठा अविष्कार गणपती आहे. त्यामुळेच गेल्या पंधरा वर्षांपासून सर्चमध्ये बाप्पाचा संग्रह आहे. मला जंगलात फिरायची आवड आहे. जंगलातली दगडे आवडतात. ज्यावर गणपतीचे स्वरुप दिसले की रंग देऊन गणपती तयार करण्याचा प्रयत्न असतो. अशा हजारो बाप्पांचा संग्रह सर्च रुग्णालयात आहे, असे डॉ. राणी बंग यांनी सांगितले.
हेही वाचा - गणेश महिमा : गणपतीचे सिध्दीविनायक नाव कसे पडले ? जाणून घ्या ईटीव्ही भारतच्या स्पेशल रिपोर्टमध्ये...