गडचिरोली- 'कोरोना व्हायरस'ने देश लॉकडाऊन झाला आहे. त्यातच लॉकडाऊनची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढल्याने हातावर पोट असणाऱ्या गरीब नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दंडकारण्यातील आदिवासी बांधवांवरही उपासमारीची वेळ आली. मात्र, उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अशिक्षित असलेले आदिवासी सुशिक्षितपेक्षाही समजूतदारपणा दाखवत आहेत. लॉकडाऊनमुळे एक प्रकारे आदिवासींची पारंपारिक जीवन जगण्याची पद्धतच बदलल्याचे चित्र दंडकारण्यात पाहायला मिळत आहे. यासंर्भात ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा.
![lockdawn rules fallow in gadchiroli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6775403_gad.jpg)
मासोळ्या तसेच लाल मुंग्या वाळवून भाजी...
गडचिरोलीतील भामरागडच्या जंगलामध्ये राहणाऱ्या कोईनगुडा गावातील आदिवासी नागरिकांना शहराशी फारशी ओळख नाही. मात्र, आधुनिकतेच्या युगात आदिवासी नागरिकही विकासाच्या प्रवाहात येऊ लागले आहेत. शहरी भागातील राहणीमान आत्मसात करू लागले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे कंदमुळे खाऊन जगणाऱ्या आदिवासींवर पुन्हा कंदमुळे खाण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प, दुकान बंद आहेत. त्यामुळे दंडकारण्यातील भागांमध्ये भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू, साहित्य पोहोचण्यास विलंब होत आहे. परिणामी जे गावात उपलब्ध होते किंवा जे घरात साठवून आहे. तेच खाण्याची वेळ आदिवासींवर आली आहे. काही आदिवासींनी मासोळ्या तसेच लाल मुंग्या वाळवून भाजी म्हणून उपयोग करीत आहेत.
![lockdawn rules fallow in gadchiroli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6775403_gadm.jpg)
मोहफुलाची दारुही काढता येत नाही...
दंडकारण्यातील आदिवासींसाठी रोजगार हमी योजना तसेच तेंदुपत्ता संकलन हे प्रमुख रोजगाराचे साधन आहे. मात्र, सध्यातरी रोजगार हमी योजनेचे काम सुरू नाही. तर पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेला तेंदूपत्ता संकलन लिलाव प्रक्रियेमुळे धूसर दिसून येत आहे. सध्या मोहफुल वेचणीचा हंगाम असल्याने अनेक जण आपल्या मुलाबाळांसह दिवसभर घराबाहेर असतात. सायंकाळीच गावात परततात. मोहफुलापासून मद्य तयार करुन काही जण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे एकत्र येण्यास किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रम घेण्यास मनाई असल्याने पंडम (आदिवासी पूजा) केल्याशिवाय मोहफुलाची दारुही काढता येत नाही.
![lockdawn rules fallow in gadchiroli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6775403_sdvfd.jpg)
सोशल डिस्टन्स ठेवत गावातील मुलांना शिक्षण...
तेंदुपत्ता संकलनामुळे उन्हाळ्यात एक ते दीड महिना आदिवासींच्या हाताला काम मिळत असते. तेंदूपत्ता संकलनातून आदिवासी नागरिक वर्षभराचा आर्थिक बजेट जुळवतात. मात्र, लॉकडाऊनमुळे तेंदूपत्ता युनिटची अद्याप विक्री झालेली नाही. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्ता हंगाम होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. तेंदूपत्ता हंगाम वाया गेल्यास मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना आदिवासींना करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तीनच्या गटाने गावातील मुलांना शिक्षण दिले जात आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कशी खबरदारी घ्यावी यासाठी नगर पंचायत कर्मचारी, आशा कामगार, पोलीस, विविध सामाजिक संघटना तसेच लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. आदिवासी नागरिकही तेवढ्याच समजूतदारपणे सामाजिक अंतर राखून व्यवहार करीत आहेत.
![lockdawn rules fallow in gadchiroli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6775403_defwef.jpg)
दरम्यान, शहरातील नागरिक लाॅकडाऊनचे पालन न करात रस्त्यावर बाहेर पडत आहेत. पोलीस त्यांना प्रसादही देत आहे. पण आदिवाशी कमी शिकलेले नागरी आपल्या भागात पोलिसांचा शहराईतका फौज फाटा नसतानाही कोरोनाबाबत खबरदारी घेत सर्व नियमांचे पालन करत आहेत.
![lockdawn rules fallow in gadchiroli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6775403_sdfsd.jpg)
हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात?...