गडचिरोली : जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील प्रसिद्ध सेवा केंद्र लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा, येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी 05 जुलै रोजी अप्रतिम अशा 'लेमन फेस्टिवलचे' आयोजन करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाचा अनेकांनी आस्वाद घेतला.
सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा हा काही दिवसांसाठी पाहुणे व पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. केवळ दवाखान्यातील रुग्णांसाठी प्रकल्प खुले आहे. येथील आश्रमशाळा इतर उपक्रमासाठी बंदच आहे त्यामुळे येथील कार्यकर्ते व कर्मचारी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. असाच एक उपक्रम येथील महिलांनी राबविला.
'लेमन फेस्टिवल' असे या उपक्रमाचे नाव! यावेळी येथील कार्यकर्त्या व शालेय कर्मचारी महिलांनी लिंबूपासून विविध पदार्थ बनविले. यामध्ये लेमन केक, लेमन कपकेक, लेमन राईस, लेमन जेली, लेमन चटनी, लेमन जॅम, लेमन पिकल (लोणचे), लेमन डिश इत्यादी पदार्थ बनवून विक्रीस ठेवले होते. सदर लेमन फेस्टिव्हलमध्ये केवळ लोकबिरादरी प्रकल्पातील कार्यकर्ते व कर्मचारी यांनी विविध पदार्थ घेऊन आनंद लुटला. लेमन फेस्टिव्हलमध्ये विविध पदार्थ बनविण्यासाठी अनिकेत आमटे व समिक्षा आमटे यांच्या पुढाकाराने कांचन गाडगीळ, फौजिया शेख, शांती गायकवाड, राणी मुक्कावार, मनिषा पवार, सुचिता पाटील, शिल्पा मोहिते, रुपा हिवरकर इत्यादी महिलांनी विविध पदार्थ बनविले. सदर फेस्टिव्हलचा आस्वाद लोकबिरादरी प्रकल्पातील कार्यकर्ते, कर्मचारी व आबालवृद्धांनी घेतला.