गडचिरोली- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रा.पं. मल्लमपोडूर मधील कुक्कामेटा गावाची समृद्ध गाव करण्याकरिता निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनातील अधिकारी कुक्कामेट्टा गावात पोहोचले. येत्या पाच वर्षांत कुक्कामेटाचा कायापालट होणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
नरेगा अंतर्गत 'आमचे गाव, आमचा विकास' पंच वार्षिक आराखडा तयार करण्यासाठी महसूल विभाग व ग्रा.पं मार्फत प्रत्यक्ष कृतीशील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितीत अधिकाऱ्यांनी शिवारफेरीत गावकऱ्यांनी सुचवलेल्या कामांची निवड केली. यामध्ये प्रामुख्याने नदीवरून लिफ्ट इरिगेशनद्वारे सिंचन सुविधा निर्माण करणे, पांदन रस्ते तयार करणे, प्रत्येक घरी शोषखड्डे, मजगी, बोडी, शेततळे, गॅबियन बंधारे, गावात पक्के रस्ते व नाल्या, सार्वजनिक शौचालय, अंगणवाडी दुरुस्ती, आदी कामांचा समावेश आहे. निवड केलेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी, रोहयो अंतर्गत कुक्कामेटा गाव समृद्ध करण्याच्या दृष्टीने गावाशी निगडीत सर्व प्रकारच्या कामांची निवड झालेली आहे. विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून गाव समृद्ध करू. निवडलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त करून १०० टक्के कामे पूर्ण करण्याचे आश्वासन तहसीलदार प्रकाश पुप्पालवार यांनी दिले.
तसेच, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कृत सिताराम मडावी यांनी ग्रामस्थांना गोंडी व माडीया भाषेत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. गावातील पंडुम-पोलवे योग्य वेळीच करा. शेतीच्या हंगामाला उशीर होता कामा नये. पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळा. संकरित वाणाचा, शेणखताचा अधिक वापर करा. प्राण्यांची शिकार करू नका, पर्यावरन वाचवा. मी वेळोवेळी कुक्कामेटा गावाला भेट देऊन गाव समृद्ध होईपर्यंत शेतीविषयी मार्गदर्शन करणार असल्याचे मडावी म्हणाले.
कार्यक्रमाला सरपंच अरुणाताई वेलादी, शाखा अभियंता सिंचन विभाग, कृषी पर्यवेक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक, आशा वर्कर आदी उपस्थित होते.
हेही वाचा- गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांचे दोनदा ठरले वेळापत्रक.. तरीही पहिलाच पेपर रद्द करण्याची नामुष्की