गडचिरोली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात बिकट स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून परिस्थिती न सुधारल्यास मुख्यमंत्री आणखी काही दिवस राज्यात लॉक डाऊनचा निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत दिली. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मंत्री विजय वडेट्टीवार आपल्या कुटुंबासह गडचिरोली येथील निवासस्थानी वास्तव्यास आहेत.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असली तरी अद्याप चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. यावर आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असून विदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकांवर नजर ठेवली जात आहे. राज्यात उद्भवलेली स्थिती अतिशय बिकट असून नागरिकांनी सावधानता बाळगली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा - कोरोनाचा धसका : तेलंगणा सरकारकडून महाराष्ट्र सीमा सील
हेही वाचा - JantaCurfew गडचिरोलीतील सर्व दुकाने बंद; बस फेऱ्या रद्द, रस्ते निर्मनुष्य