गडचिरोली - देशातील २५ अतिमागास जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश आहे. त्यामुळेच येथे बालकांच्या कुपोषणाचा प्रश्नही गंभीर आहे. यावर तोडगा म्हणून मुलचेरा तालुका प्रकल्प कार्यालयाने कुपोषण निर्मूलनाचा प्रकल्प राबवला आहे. याचे नाव आहे 'परसबाग'. या प्रकल्पचा चांगलाच फायदा बालकांसहित गरोदर आणि स्तनदा मातांना होत आहे.
मूलचेरा तालुक्यात ११६ अंगणवाडी केंद्र आहेत. यातील ५८ केंद्रांमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवली जाते. यात गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहार दिला जातो. हा उपक्रम लाभार्थींसाठी लाभदायक ठरत आहे.
क्रांतीचा रंग 'हिरवा'
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी १९८२ पासून नवी क्रांती आणण्याच्या प्रयत्नात क्रांतीचा रंग लाल असल्याचे भासविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यात जिल्ह्याची अपरिमित हानी झाली आहे. सगळीकडे असं चित्र दिसतं की क्रांती म्हणजे क्षोभ, क्रांतीचा रंग लाल. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील एक सर्वार्थाने दुर्लक्षित तालुका म्हणून मूलचेरा तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील ११६ अंगणवाड्यांच्या बाजूला १० बाय २० तर कुठे १२ बाय १५ अशा छोट्याश्या जागेत त्यांनी परसबाग उभी केली.
परसबागेतील या क्रांतीचा रंग हिरवा आहे. त्यात व्हिटॅमिन्स, लोहतत्त्व, प्रथिने आहेत. आणि ही क्रांती कुणाला होरपळून काढणारी नव्हे, अधिकारासाठी जमिनीचा रंग लाल करणारी नव्हे. तर ती आहे सेवेची, समर्पणाची, निरागस चेहर्यावर हास्य फुलवणारी. गावागावात चैतन्याचा मंत्र देणारी, आनंद निर्माण करणारी, पोषण देणारी, आरोग्य समृद्ध करणारी, उदरभरण करून शिक्षणाचे कित्ते गिरविण्यासाठी विद्यार्थी तयार करणारी, कुपोषणाच्या चटक्यांपासून वाचविणारी. मूलचेराचे सीडीपीओ विनोद हटकर यांचा या संकल्पनेत मोठा वाटा आहे.
अंगणवाड्यांमध्ये परसबाग
पहिल्याच वर्षी अंगणवाड्यांमध्ये परसबाग उभी राहिली. त्यात मेथी, चवळी, पालक, मुळा, कोबी, कोथिंबीर, वांगी, शेंगा, लवकी, दुधी असा मिश्र भाजीपाला लागवड केला. त्यातून उत्पादित ताज्या भाज्या अंगणवाडीतील पोषण आहारात देणे सुरू झाले आणि पाहता–पाहता यश मिळत गेले. लोकांचा दृष्टिकोन बदलायला लागला, विद्यार्थी संख्या वाढली. बालकांच्या आरोग्याचे प्रश्न कमी झाले. कुपोषणावर काही अंशी नियंत्रण आणण्यात यश मिळाले आहे. मुलचेरा तालुक्यातील ११६ अंगणवाड्यांमध्ये परसबागेतील हिरवी क्रांती मोठ्या डौलाने डुलत आहे. निरागस बालकांच्या, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवित उभी आहे.