गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत संपूर्ण कसनसूर दलमच्या 13 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 दलाला यश आले, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गृहमंत्र्यांकडून कौतूक -
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील शुक्रवारी नागपूर दौऱ्यावर असताना गडचिरोली पोलिसांच्या शौर्य पूर्ण कामगिरीचे कौतूक करण्यासाठी ते थेट गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून घटनेची माहिती दिली. कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात नक्षलवादी दरवर्षीप्रमाणे तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. याबाबत गडचिरोली पोलीस दलाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी सकाळी 6 ते 7.30 वाजेच्या सुमारास सी-60 जवान अभियान राबवत असताना लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. त्यावेळी जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. ही चकमक सुमारे दीड तास चालली. मात्र, चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले.
मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त -
चकमकीनंतर जवानांनी शोध अभियान राबवले असता घटनास्थळी 6 पुरुष नक्षलवादी आणि 7 महिला नक्षलवादी अशा 13 जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावर एके-47, एसएलआर बंदूक, कार्बाइन, 303, 12 बोर रायफल, स्फोटके, दैनंदिन वापराचे अनेक साहित्य आढळून आले. नक्षलवाद्यांचे मृतदेह हेलिकॉप्टरद्वारे पोलीस मुख्यालयात आणण्यात आले असून मृतकांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा - चार मुलींनी दिला आईच्या मृतदेहाला खांदा, तर पाचव्या मुलीने दिला मुखाग्नी