गडचिरोली - भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने आज सकाळी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून तब्बल २७ हजार ९८८ क्यूमेक पाणी सोडण्यात येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले आहेत. तर शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चालू आठवड्यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाल्यांना पूर आला आहे. गोसेखुर्द धरणातील जलसाठाही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रविवारी सकाळी साडेआठ वाजता प्राप्त माहितीनुसार या धरणाचे २३ दरवाजे साडेचार मीटरने, तर १० दरवाजे चार मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून २७ हजार ९८८ क्यूमेक पाणी सोडण्यात येत आहे. गोसेखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. गोसेखुर्द धरणातून २४ ऑगस्ट २०१३ रोजी १६ हजार ६२५ क्यूमेक, तर ९ सप्टेंबर २०१९ रोजी १३ हजार ७३९ क्यूमेक्स पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आज सर्वाधिक पाणी सोडण्यात आले आहे. गोसेखुर्दच्या पाण्यामुळे नद्या व नाले फुगले असून, पाणी रस्त्यावर आले आहे.
सतर्कतेचा इशारा -
रविवारी पहाटेपासून आरमोरीनजीकच्या वैनगंगा नदीच्या पुलावर पाणी आले आहे. वैनगंगा, गाढवी व पाल नदीला पूर आल्याने गडचिरोली-आरमोरी मार्ग, शिवणी व गोविंदपूर नाल्याच्या पुरामुळे गडचिरोली-चामोर्शी, गाढवी नदीच्या पुरामुळे आरमोरी-रामाळा, तसेच रस्त्यावर पाणी आल्याने देसाईगंज-लाखांदूर हे मार्ग बंद झाले आहेत. वैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आष्टी-गोंडपिपरी मार्ग बंद झाला आहे. पुरामुळे नदीकाठच्या गावांमधील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शेजारच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव-हळदा परिसरालाही पुराचा तडाखा बसला आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.