गडचिरोली - जिल्हयात जिल्हा मुख्यालयी 1 मुख्य नियंत्रण कक्ष व इतर 11 तालुक्यात असे मिळून 12 कोविड नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व नियंत्रण कक्षातून दैनंदिन स्वरूपात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या प्रकारे मदत मिळत आहे.
सध्या कोविड संसर्गामूळे सर्व स्तरावर धावपळ सुरू आहे. अशातच रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळावी व गरजूंना वेळेत उपचार किंवा बेड उपलब्ध व्हावेत म्हणून या नियंत्रण कक्षांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. बहूतेक नातेवाईकांना रुग्णांना भेटता येत नाही अथवा त्यांना भेटणे संसर्गामूळे शक्य नसते. अशा वेळी सदर रुग्णांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी या कोविड नियंत्रण कक्षाची चांगली मदत होत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय देणेत येत आहे. सर्व गृहविलगीकरणातील रुग्णांवर आरोग्य विभागाच्या देखरेखी खाली घरी ठेवण्यात आले आहे. अशा वेळी अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत या कोविड नियंत्रण कक्षाची मदत होत आहे. अशा रुग्णांना दूरध्वनीद्वारे आवश्यक मदत दिली जाते. अथवा आपतकालीन स्थिती असल्यास दवाखान्यात हलविण्यासाठी नियोजन केले जाते. 1 मे पासून आत्तापर्यंत जिल्हा मुख्यालयातील प्रमुख कोविड नियंत्रण कक्षामध्ये 307 नागरिकांनी संपर्क केला. तसेच नियंत्रण कक्षाकडून 1595 रूग्ण किंव त्यांचे नातेवाईक यांना संपर्क करण्यात आला आहे.
बेडची उपलब्धता-
एप्रिलपासून कोरोना संसर्ग जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाढला. रूग्णसंख्या वाढली तसे बेड कमी पडू लागले. प्रशासनाकडून बेडची संख्याही वाढविण्यात आली. परंतु काही वेळा ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे. काही रूग्ण प्रतिक्षेत असतात. अशावेळी नेमके रूग्णाला कुठे ॲडमिट करायचे? कुठे बेड उपलब्ध आहे? याचे उत्तर या नियंत्रण कक्षाकडे मिळते. तसेच आरोग्य विभागांतर्गत सनियंत्रणासाठी सर्व रूग्णांची स्थिती संगणकावर अपडेट केली जाते. यातून कोणत्या रूग्णाला कोणत्या वार्डमध्ये ठेवायचे हेही या नियंत्रण कक्षाच्या अहवालावरून समोर येते. यानंतर संबंधित डॉक्टर निर्णय घेतात. यातून बेडची उपलब्धता लक्षात येते.
तक्रारीबाबतही मदत -
जिल्ह्यातील कोविड दवाखान्यांमध्ये मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत काही तक्रारी असल्यास नागरिक येणाऱ्या अडचणी दिलेल्या संपर्क क्रमांकावर नोंदवू शकतात. बेड उपलब्धता, गृहविलगीकरणातील रुग्ण अशा विषयांबाबत वेगवेगळया प्रश्नांवर नागरिक या कोविड नियंत्रण कक्षाकडे संपर्क करू शकतात. संबंधित नियंत्रण कक्ष आपली तक्रार नोंदवून तिचा पाठपूरावा करून तक्रारदाराला माहिती देतात. तसेच तक्रारी सोडविण्याबाबत संबंधित यंत्रणेला यातून सूचना दिल्या जातील.