गडचिरोली - नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या भागातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. तसेच पूर आणि विकासासंदर्भात आढावा घेतला. तसेच पूरबाधितांसाठी आणि व्यापाऱ्याच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
गेल्या महिन्यात भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये आदीवासी बांधवांची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी भामरागड पूरस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पूरपीडितांना जीवनावश्यक वस्तूंचे १२८ किटचे वाटप केले. तसेच तालुक्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत उर्वरीत किट शासकीय यंत्रणेद्वारे पोहोचविण्यात येतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूर येतो. त्यामुळे शेतीसह घरांचे नुकसान होते. तसेच आता पर्लकोटा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम होणार आहे. त्यामध्येही काही घरे उद्ध्वस्त होणार आहे. त्याचीही भरपाई देऊन पुनर्वसन करण्याची मागणी त्रिवेणी व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आली. याबाबत एक निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी पूरपीडित नागरिकांना आणि व्यापारी वर्गाला पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. तसेच पर्लकोटा नदीवरील पुलाचे बांधाकम लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितेल.
भामरागड तालुक्याला तीन नद्यांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कायमस्वरुपी पाण्याची सोय व्हावी यासाठी उपसा जलसिंचन प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाला पाठवा, असे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच भामरागड नगरपंचायतीसाठी पुरेसा निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी जिल्हाअधीकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी गडचिरोलीचे आशिष येरेवार, भामरागडचे तहसीलदार सत्यानारायण सिलमवार, उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ. कुणाल सोनवणे आदी उपस्थित होते.