गडचिरोली - ऑल इंडिया चेस फेडरेशन मार्फत राष्ट्रीय स्तरावर 'चेस इन स्कुल' या विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा येथील भाग्यश्री सुरेश भांडेकर उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कोण आहे भाग्यश्री?
'चेस इन स्कुल' या परीक्षेसाठी विविध गटांमध्ये खेळाडूंचे वर्गीकरण करण्यात आले होते. प्रथम गटामध्ये भाग्यश्री सुरेश भांडेकर हिचा समावेश करण्यात आला होता. या गटाला ग्रँडमास्टर अनुराग महामल, प्रफुल झावेरी यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचे आयोजन ऑनलाइनरित्या करण्यात आले होते. यात देशातून जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेत भाग्यश्री भांडेकर हिने यश संपादित करून स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेत बुद्धिबळ या खेळाचे नाव देशभर उंचावले आहे. या परीक्षेत देशातून फक्त 17 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे. भाग्यश्री भांडेकर ही कुनघाडा येथील शेतकऱ्याची मुलगी असून सध्या ती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तयारी करीत आहे. भाग्यश्री भांडेकर हिला आजपर्यंत विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे. 2017मध्ये स्टुडंट अॉलम्पिक बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक, 2016मध्ये ओबीसी युवा महोत्सवात द्वितीय क्रमांक, 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक, 2020मध्ये राज्य बुद्धिबळ पंच परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
हेही वाचा -डोंबिवलीत एक रुपये प्रति लिटर पेट्रोल, नागरिकांच्या लांब रांगा