गडचिरोली - सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्यावतीने सामाजिक अधिकारिता शिबिर अंतर्गत 15 दिव्यांगांना एडिप योजनेअंतर्गत नि:शुल्क सहायक उपकरणाचे वितरण कृषी महाविद्यालय, सोनापूर कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात उपस्थित होते.
दिव्यांग समाजाच्या मुख्य धारेमध्ये येण्यास सक्षम - गेहलोत
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन करुन गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करुन दिव्यांगांचे अभिनंदन केले. दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप केल्यामुळे ते समाजाच्या मुख्य धारेमध्ये येण्यास सक्षम होतील. दिव्यांगांना शासनाचे लाभ हे कुठेही घेता येऊ शकते. दिव्यांग व्यक्ती हे अधिक सक्षम व स्वालंबी होतील याकडे शासनाचे प्रयत्न आहे. एडिप योजनाअंतर्गत आधुनिक उपकरण तयार करण्यात आले असून ते देण्यात येत आहे. त्यामुळे ते अधिक सक्षमपणे कार्य करतील. यावेळी विविध 15 दिव्यांगांना त्यांनी आवश्यक साहित्याचे वाटप ऑनलाईन स्वरूपात केले.
विविध साहित्य वाटप -
खासदार अशोक नेते यांनी दिव्यांगांना होत असलेल्या साहित्य वाटपाबद्दल समाधान व्यक्त करुन आज होत असलेल्या कार्यक्रमात सर्वांना बोलावणे शक्य झाले नाही तरी तालुका स्तरावर सर्वांना यापुढे याप्रकारेच दिव्यांगांना नि:शुल्क साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे असे ते म्हणाले. तसेच यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त तसेच आदिवासी जिल्हा असून जिल्ह्यातील दिव्यांगांना नि:शुल्क साहित्य पुरविल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. तसेच नि:शुल्क साहित्याचे वाटप केल्यामुळे दिव्यांगांना समाजात मुख्य प्रवाहात येणे शक्य होईल असे प्रतिपादन केले. यावेळी विविध 15 दिव्यांगाना ट्रायसायकल, कानाची मशीन, व्हल चेअर, एमएसआयईडी किट, डेजी प्लेअर, स्मार्ट केन अशा साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.