गडचिरोली : साधारण सर्दी, ताप, खोकला असला तरी कोरोना पॉझिटिव्ह म्हणत उचलून नेत असल्याच्या गैरसमजामुळे कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या महिलेला रुग्णालयात आणण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिकेमधील कोरोना पथकावर नागरिकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी चामोर्शी तालुक्यातील घारगाव येथे घडली. या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे. दरम्यान तहसीलदार गंगथडे यांनी मध्यस्थी करून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
चामोर्शी तालुक्यातील घारगाव येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. तिला उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्याकरता रुग्णवाहिका घारगाव येथे पोहोचली. आरोग्य विभागाचे कर्मचारी तिला आणण्यासाठी जात असताना गावकर्यांनी प्रचंड विरोध दर्शवत चक्क कोरोना पथकावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस सुद्धा होते, तरी गावकरी कुणालाही न जुमानता पथकावर धावून आल्याने अखेर कोरोना पथकाने गावातून काढता पाय घेतला.
दरम्यान गावात कुणालाही साधारण सर्दी, ताप, खोकला असला तरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगत घेऊन जात असल्याचा गैरसमज अनेक गावांमध्ये निर्माण झालाय. त्यामुळे अनेक गावातील नागरिक घरोघरी येऊन सर्वे करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही दमदाटी करीत असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज असून प्रशासनाने यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज आहे.
हेही वाचा : जळगाव दौरा रद्द करून जयंत पाटील मुंबईकडे रवाना; राष्ट्रवादीत लवकरच मोठ्या पक्ष प्रवेशाची शक्यता