गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील गुंडापल्ली जंगल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत मोहाची दारू, मोहसडवा व अन्य सामग्री असा 6 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, कारवाई दरम्यान आरोपी जंगलाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
गुंडापल्ली गावच्या जंगल शिवारात तुंबडी नाल्याजवळ काही लोक हातभट्टी लावून मोहाची दारू काढत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दादाची करकाडे यांच्या नेतृत्वातील चमुने घटनास्थळावर धाड टाकली. तुंबडी नाल्याच्या काठाने पथकाने पाहणी केली असता घटनास्थळावर 50 लिटर क्षमतेच्या 6 प्लास्टिक कॅनमध्ये मोहाची दारू आढळली. त्याची किंमत 60,000 रुपये, दोनशे किलो क्षमतेच्या 11 प्लास्टिक ड्रममध्ये मोहसडवा किंमत 3 लाख 80 हजार, 100 किलो क्षमतेच्या 14 प्लास्टिक ड्रम्समध्ये प्रत्येकी बाराशे किलो मोहसडवा ज्याची किंमत 1 लाख 14 हजार, एक दुचाकी असा एकूण 6 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यातील मोहसडवा जागेवरच पंचनामा करून नष्ट केला.
![Gadchiroli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gad-01-daru-news-7204540_18042020160956_1804f_1587206396_919.jpg)