गडचिरोली - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्याअंतर्गत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. किराणा दुकान, मेडिकल, भाजीपाला दुकानाच्या बाहेर चौकोनी खुना करून संसर्ग टाळण्यासाठी 'सोशल डिस्टन्स' ठेवण्यात येत आहे. पोलिसांनीही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना लाठ्यांचा प्रसाद न देता वाहन चलान करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांच्या संख्येत घट आली आहे.
संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहेत. पोलीस विभागाकडून सायरन वाजवून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक ऐकायला तयार नसल्याने पोलिसांनी चलान फाडण्याची कारवाई सुरू केली आहे. अहेरी शहरात गुरुवारी दिवसभर शंभरहून अधिक वाहनधारकांचे चालन फाडण्यात आले. तर सार्वजनिक स्वच्छतेसाठी गडचिरोली, अहेरी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा आदी नगरपंचायतीने शहरातील संपूर्ण भागात सॅनिटायजर फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.