गडचिरोली - जिल्ह्याचे तात्पुरते पालकमंत्री म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची गुरुवारी नियुक्ती झाली. नियुक्ती होताच वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्ह्याच्या कोरोना स्थितीबाबत आढावा घेतला. शासनाची भूमिका लॉकडाउन करुन जनतेला अडचणीत आणण्याची नसून ती सुरक्षेकरिता आहे. याबाबत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, स्थलांतरित लोकांची व्यवस्था याबाबत आढावा घेतला. प्रशासनाने केलेल्या संचारबंदीच्या कामामुळे व लोकांच्या सहकार्याने जिल्हा कोरोनामुक्त राहिला आहे. यापुढेही आपल्याला ही लढाई सुरू ठेवायची आहे. या दरम्यान काही लोकांना अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, प्रशासन यासाठी आवश्यक मदत वेळेत पोहचवत आहे. जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुढेही अखंड सुरू राहील याकरता नागरिकांनी काळजी करु नये, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले.
संचारबंदीमुळे सर्वच कामांना बंदी घालण्यात आली होती. तेंदूपत्ता संकलन जिल्ह्यातील महत्वाचा व्यवसाय असून त्याबाबत आता परवानगी देता येईल, असे त्यांनी बैठकीत सूचना केल्या. ऑनलाईन स्वरुपात 7/12 मिळत नसल्यास त्यांना घरपोच तो उपलब्ध करुन देण्यासाठी योजना तयार करा अशा सूचना केल्या. यामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक कर्जासाठी मदत मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी तहसिलदार यांच्याशी चर्चा करुन याबाबत गरजूंना 7/12 घरपोच देणेकरता नियोजन करणार आहेत.