गडचिरोली - हे दृश्य पाहून तुम्ही म्हणत असाल हे तर पंचतारांकित हॉटेल आहे... पण नाही... आश्चर्यचकीत झालात ना.... होय हे खरे आहे... हे दृश्य पंचतारांकित हॉटेलचे नाही तर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षाचे आहे. गेल्या वर्षभरापासून अख्खे जग कोरोना महामारीशी झगडत आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा अनेक रुग्णालयाचे बेड कमी पडायला लागले. अतिदक्षता विभागात जागा मिळत नव्हती. अनेकांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. त्यामुळे राज्य सरकारने सर्व जिल्हा मुख्यालयातील रुग्णालय हायटेक करण्याचा निर्णय घेतला. असाच निर्णय गडचिरोली जिल्हा प्रशासनाने घेत नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे.


एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण
या दृश्यांमध्ये हा अतिदक्षता विभाग नाही तर कुठल्यातरी पंचतारांकित हॉटेल असल्याचा भास होतो. मात्र हे दृश्य गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे असून नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अतिदक्षता विभागाचे लोकार्पण झाले. अत्याधुनिक अशा अतिदक्षता विभागात हायटेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तुकाराम मुंढेंनी शेअर केला व्हिडिओ
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याचे मुख्यालय अशाप्रकारचे हायटेक अतिदक्षता विभाग उभारण्यात आल्याने राज्यात नेहमी चर्चेत राहणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनीही आपल्या ट्विटर हॅण्डलवरून व्हिडिओ शेअर करत गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला व आरोग्य विभागाचे कौतुक केले आहे. एकूणच येथे उभारण्यात आलेल्या हायटेक अशा अतिदक्षता विभागामुळे गडचिरोली येथील आरोग्य सेवा आणखी बळकट झाली आहे.