गडचिरोली - राज्यातील सर्वात शेवटचे टोक असलेला गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल भाग आहे. तसेच हा जिल्हा नेहमीच नक्षली कारणांमुळे चर्चेत असतो. या जिल्हात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीत ६८.५९ टक्के मतदान झाले. तर, २०१४ मध्ये ५८.६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाच्या टक्क्यांमध्ये वाढ झाली आहे.
२०१४ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तीनही मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती. त्यामुळे या वेळेसही भाजप आपला दबदबा कायम ठेवतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५८.५२ इतकी होती. यामध्ये भाजपचे डॉ देवराव होळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री गेडाम यांचा पराभव केला होता. डॉ होळी यांना या मतदारसंघातून ४३.१९ टक्के मत पडले होते. तर यावेळी ६८.५४ टक्के मतदान झाले आहे.
हेही वाचा - गडचिरोली : नक्षलवाद्यांना न जुमानता १३ किलोमीटर प्रवास करत बजावला मतदानाचा हक्क
तर, अहेरी मतदारसंघात २०१४ मधील निवडणुकीत ७०.२४ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत एकाच घरातील तीन उमेदवारांत लढत होती. यात भाजपचे अंबरीष राजे आत्राम यांनी राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्राम यांचा पराभव केला होता. धर्मराव बाबा आत्राम यांना दुसरे स्थान मिळाले तर, अपक्ष उभे असलेले दीपक आत्राम हे तिसऱया स्थानी होते. या निवडणुकीत अंबरीष राजे यांना ३७.२९ टक्के मत पडले होते. तर, यावेळेच्या निवडणुकीत या मतदारसंघात ७०.३४ टक्के इतके मतदान झाले आहे.
हेही वाचा - गडचिरोलीत निवडणुकीचे कर्तव्य बजावताना एका 'न्यूटन'चा मृत्यू
आरमोरी मतदारसंघात २०१४ तील विधानसभा निवडणुकीची मतदानाची टक्केवारी ही ७२.३७ होती. यात भाजपच्या कृष्णा गजभे यांनी काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा पराभव केला होता. गजभे यांना या निवडणुकीत ३४.९४ टक्के मत पडले होते. तर, यावेळेच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्क्यात वाढ झाली आणि ७२.१३ टक्के मतदान या मतदारसंघात झाले आहे.
२०१९ विधानसभा निवडणूक प्रमुख लढत
यंदा गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ देवराव होळी आणि काँग्रेसच्या चंदा कोडवते मध्ये चुरस आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे अंबरीष आत्राम, काँग्रेसच दीपक आत्राम आणि वंचितचे लालसु नोगोटी यांच्यात लढत आहे.
आरमोरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे कृष्णा गजभे आणि काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांच्यात चुरस आहे.
हेही वाचा - गडचिरोलीत मतदानाला सुरुवात; समाजसेवक बंग दांम्पत्याने केले मतदान