गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अशोक नेते पुन्हा लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांची संपत्ती ५ वर्षांत ४ पटीने वाढली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या संपत्तीत १० लाखांची वाढ झाली आहे. निवडणूक अर्ज दाखल करताना दोघांनीही सादर केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.
भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढवली. तेव्हा चल संपत्ती ३९ लाख ८ हजार २६ रुपये होती. तर अचल संपत्ती ७५ लाख रुपये होती. त्यांची एकूण संपत्ती १ कोटी १४ लाख ८ हजार रुपये इतकी होती. त्यावेळी त्यांच्यावर ५८ लाख ३० हजार ५५० रुपयांचे कर्ज होते. अशोक नेते व्यावसायिक असून ते शिवकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रोप्रायटर आहेत. आता त्यांची चलसंपत्ती ६९ लाख ९१ हजार ४७२ एवढी आहे. तर अचल संपत्ती ४ कोटी ६ लाख ६१ हजार रुपयांची झाली आहे. मात्र, त्यांच्यावरील कर्ज पाच वर्षात ९८ लाखांनी वाढले असून ते १ कोटी ५६ लाख ८२ हजार रुपयांवर पोहोचले आहे. यात घराच्या बांधकामासाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे.
काँग्रेसकडून उमेदवारी सादर करणारे डॉ. नामदेव उसेंडी यांच्याकडे २०१४ मध्ये ५५ लाख १४ हजार ९११ रुपयांची चल संपत्ती तर ९१ लाख १५ हजार रुपयांची अचल संपत्ती, अशी एकूण १ कोटी २६ लाख १९ हजार रुपयांची संपत्ती होती. यावेळेस त्यांची चल संपत्ती कमी होऊन ती ४६ लाख ८१ हजार ५२७ आहे. मात्र, अचल संपत्तीत वाढ झाली असून ती ८९ लाख ९२ हजार ५७५ रुपये इतकी झाली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी ७६ लाख ९ हजार रुपयाचे कर्ज फेडल्याने आता त्यांच्यावर १७ लाख ७३ हजार एवढे कर्ज आहे. एमबीबीएस, एमडी असे शिक्षण घेतलेले व शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. नामदेव उसेंडी यांनी काम केले आहे.
काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी भरणारे डॉ. नामदेव किरसान यांची ५१ लाख ३७ हजार १७५ रुपयांची तर पत्नीच्या नावे १६ लाख ७९ हजार ६८९ जंगम मालमत्ता, तर स्वतः च्या नावे ५० लाख रुपयांची व पत्नीच्या नावे १ कोटी ५५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी भरणारे रमेशकुमार गजबे हे सुद्धा पेशाने डॉक्टर राहिले आहेत. ते माजी राज्यमंत्री सुद्धा राहिले असून त्यांनी आपल्या शपथपत्रात मालमत्तेचा तपशील देताना १ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. तर पत्नीच्या नावे किंवा मुलांच्या नावे कोणतीही मालमत्ता नाही. तर जंगम मालमत्तेमध्ये ९०१२ रुपये बचत असून पत्नीच्या नावे २० हजार रुपये बचत, या व्यतिरिक्त कोणतीही जंगम मालमत्ता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.