गडचिरोली - येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांनी दगड वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना दाखविण्याची मागणी करणाऱ्या महसूल मंडळ अधिकाऱ्यास मारहाण करुन व ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी खुणे याला अहेरी पोलीसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आलापल्ली येथील मंडळ अधिकारी संतोष श्रीरामे हे 27 जून रोजी बोरी गावाजवळ खमनचेरु येथील कोतवाल किशोर दुर्गे यांच्यासह वाहनांचा वाहतूक परवाना तपासणी करण्याचे कर्तव्य बजावित होते. दरम्यान, दगड भरलेल्या एका टिप्परच्या चालकाला श्रीरामे यांनी वाहतूक परवाना विचारला असता काही वेळाने प्रणय खुणे हे अन्य तिघांसह आपल्या वाहनाने (एम.एच. 40 बी.ई. 1022) त्या ठिकाणी आले. श्रीरामे यांना वाहतूक परवाना विचारण्याचा तुला कोणी अधिकार दिला, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली, अशी तक्रार संतोष श्रीरामे यांनी अहेरी पोलीस ठाण्यात केली होती.
याप्रकरणी प्रणय खुणे व त्याच्या तीन साथीदारांवर अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर खुणे फरार झाला होता. त्याला पोलिसांनी अटक करुन न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, प्रणय खुणे हा काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेत ग्रामसेवक होता. नोकरीचा राजीनामा देऊन त्याने बांधकाम ठेकेदार म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून जिल्हा उपाध्यक्षपदही मिळविले आहे. तो लोकप्रतिनिधींचा चाहता सुद्धा असल्याची भाजपमध्ये मोठी चर्चा आहे.
हेही वाचा - उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या