गडचिरोली - जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोविड सेवा केंद्रावरील कर्तव्यावर असलेले डॉ. अभिजीत मारबते यांना मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी लॉरेन्स गेडाम याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवाद्यांचा खात्मा
लॉरेन्स गेडाम याने कोविड सेंटरवर जाऊन येथे मागील दोन महिन्यापासून कोविड केंद्रातच मुक्काम करून रुग्णांना सेवा देणारे युवा डॉ. अभिजीत मारबते यांच्यासोबत बाचाबाची करत मारहाण केली. या केंद्रात डॉ. अभिजीत मारबते हे सतत ड्युटी करीत आहेत. ते एकही दिवस सुट्टी न घेता, तसेच केंद्रात राहून रुग्णांची सेवा करीत आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा गुंड प्रवृतीचा असून विधानसभा निवडणुकीत त्याच्यावर उमेदवार बग्गू ताडाम यांचे अपहरण करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात काँग्रेसचे उमेदवार, तथा माजी आमदार आनंदराव गेडाम यांना मुलासह पूर्ण निवडणूक प्रचार होईपर्यंत फरार व्हावे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने ते स्वतहून कोर्टात हजर झाले. लॉरेन्स गेडाम हा जामीनावर आहे, हे विशेष.
लॉरेन्स गेडाम याच्यावर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, यासाठी पोलीस स्टेशन आरमोरी येथे नागरिक पोहचले. त्यानंतर आरमोरी पोलिसांनी लॉरेन्स गेडाम याच्यावर मारहाणीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली असून लॉरेन्स यास तत्काळ अटक न झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, डॉक्टर, नर्स यांनी संपावर जाण्याची चेतावणी दिली आहे.
हेही वाचा - रमजान ईद साधेपणाने साजरी करावी - जिल्हाधिकारी दीपक सिंगला