गडचिरोली - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा व पामुल गौतम नदीला पूर आला. त्यामुळे मागील आठ दिवस भामरागडमधील 70 टक्के घरं पाण्याखाली होते. सध्या भामरागडमधील पूर ओसरू लागला आहे. पुरामुळे पर्लकोटा नदी पुलावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. श्रमदानातून रस्त्याची स्वच्छता करण्याचे काम स्थानिक नागरिकांनी हाती घेतले.
यावर्षीच्या मुसळधार पावसाने भामरागडच्या नागरिकांना जेरीस आणले. यामुळे सात वेळा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. गेल्या आठ दिवसांपासून येथील शेकडो घरे पाण्याखाली होती. मात्र, येथील नागरिकांना स्थानिक प्रशासनाव्यतिरिक्त इतर कोणाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संतात व्यक्त केला.
हेही वाचा - शिवस्वराज्य यात्रेत बाबा आत्राम अनुपस्थित; भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना पेव
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हवाई पाहणी करून पूरस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा भामरागडमधील भयावह पूरस्थिती समोर आली. त्यानंतर मदतीसाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला.
संजय सरोवराचे पाणी गोसीखुर्द धरणात आणि गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीमध्ये सोडल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी, आष्टी-चंद्रपूर हे प्रमुख महामार्ग काही काळ बंद ठेवण्यात आले.