गडचिरोली - सातत्याने मुसधार पाऊस व पूर परिस्थितीचा सामना करणाऱ्या भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान पीकासह शेतीजमीनीचे मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन आठवड्यात मुसळधार पावसाने येथील इंद्रावती, पामुलगौतम व पर्लकोटा नद्या रौद्ररुप धारण केले होते.
त्यामुळे आठ दिवस या नदीकाठचे शेतपीक पाण्यात बुडले होते. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीकही गेले आहे. तसेच मातीही वाहून गेल्याने जमीन खरवडली आहे. आता शेतात रेतीचे ढिग जमा झाले आहेत.
यावर्षी नांगरणी व रोवणीसाठी शेतकऱ्यांनी जवळपास 55 हजारांपर्यंत खर्च केला. मात्र पाच एकर शेतीत पाव एकरचे देखील पीक वाचले नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले असून जगायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मुलांचं शिक्षणं, पीककर्ज याचे हफ्ते कसे भरायचे, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. दक्षिण गडचिरोली भागात जून, जूलै महिना कोरडा गेला. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात कहर केला. परिणाम तालुक्यातील इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा व भांडीया नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. भामरागडमध्ये 15 ऑगस्टच्या रात्रीपासून पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी शिरले. पुरामुळे दोन दिवस भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा 19 ऑगस्टपासून 23 ऑगस्ट दुपार पर्यंत भामरागड बाजारपेठ पाण्याखाली होती. अनेकांचे सामान पाण्यात भिजल्याने नुकसान झाले. पीक वाहून गेले, साहित्य पाण्यात भिजले, त्यामुळे जगण्याची मोठी गंभीर समस्या येथील शेतकऱ्यांसमोर होती.
लवकरच पंचनामे होणार
आतापर्यंत कोणत्याही नागरिकांनी नुकसान झाल्याबाबत तक्रार केलेली नाही. तरी दहा बारा दिवसांपासून मुसळधार पावसाने नुकसान झालेच असावे. तब्बल आठ दिवसानंतर पावसाने उसंत घेतली. काल दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पूर ओसरला. नदी-नाले उतरल्याने आज घरांचे, शेतीचे व पाळीव प्राणी इत्यादींचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. पंचनाम्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना निर्देश दिले आहे. तीन दिवसांत झालेल्या नुकसानाचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याचे तहसिलदारांनी सांगितले. याबाबत माहिती जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.