गडचिरोली - वैध मापन शास्त्र विभागाच्या वतीने दुकानदारांच्या वजनकाट्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. आज 10 जानेवारी रविवारी गडचिरोली शहरातील आठवडी बाजारात तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासणी दरम्यान 13 भाजीपाला, फळे विक्रेत्यांनी वार्षिक पडताळणी व मुद्रांकन न केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र वैधमापन शास्त्र अधिनियम 2009, वैधमापन शास्त्र अंमलबजावणी अधिनियम 2011 नुसार कारवाई करून गुन्हे नोंदविण्यात आले.
आठ दिवसांपासून सुरू आहे मोहीम -
रविवारी गडचिरोली शहरातील आठवडी बाजारात वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक रूपचंद फुलझेल यांच्या उपस्थितीत तपासणी मोहीम राबविण्यात आली. आठवडी बाजारातील 40 भाजीपाला, फळ विक्रेते तसेच काही नाश्ता विक्रेत्यांच्या वजन काट्यांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान 13 भाजीपाला, फळे विक्रेत्यांनी वार्षिक पडताळणी व मुद्रांकन न केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर महाराष्ट वैधमापन शास्त्र अधिनियम 2009, वैधमापन शास्त्र अंमलबजावणी अधिनियम 2011 नुसार कारवाई करून गुन्हे नोंदविण्यात आले. सदर कारवाई वैधमापन शास्त्रविभाग चंद्रपूर गडचिरोलीचे सहायक नियंत्रक ह.तू.बोकडे यांच्या आदेशानुसार निरीक्षक रूपचंद फुलझेले, कर्मचारी प्रकाश उके, चंदू मेश्राम, आनंद उके, मनोहर बांबोळे यांच्या पथकाने केली.