गडचिरोली - जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा हत्या सत्र सुरू केल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस ठाणे हद्दीतील गुडंजूर येथील रवि झुरू पुंगाटी (वय 28 वर्ष) यांची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली आहे.
रवि पुंगाटी शेतकरी असून, गुरुवारी रात्री राहत्या घरी कुटुंबासह झोपले असताना, मध्यरात्रीच्या सुमारास 15 ते 20 शस्त्रधारी नक्षलवादी त्याच्या घरी आले. रवि यांना झोपेतून उठवून गावाच्या बाहेर घेऊन गेले आणि त्यांची हत्या केली. सकाळी नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.