गडचिरोली - जिल्ह्यातील अहेरी वनपरिक्षेत्रात मोसम या गावातील एका शेतकऱ्याच्या घरी चितळाचे मांस आढळून आल्याने त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. महेश पोरतेट असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. गोपनीय माहितीच्या आधारे वनपथकाने शनिवारी पोरतेट याच्या घरी धाड घालून दुर्मिळ श्रेणीतील चितळाची शिकार उजेडात आणली. चितळ मांस कापत असतांना त्यांना ताब्यात घेतल्याने वनविभागाची छापेमारी यशस्वी ठरली. या धाडीत मोसम गावातील रमेश कुळमेथे आणि कमलापूर गावातील संजय वेलादी यांच्या ताब्यातील मृत चितळाचे डोके, पाय, मांस व कापण्याकरिता वापरण्यात आलेले अवजारे ताब्यात घेतले आहे..
शेतीच्या कुंपणाला लोखंडी अर्थिंग तारेचे फासे -
अहेरी तालुक्याच्या मोसम जंगल नियतक्षेत्रातील खंड क्रमांक 649 ला लगत असलेल्या महेश पोरतेट यांच्या शेतीच्या कुंपणाला लोखंडी अर्थिंग तारेचे फासे तयार करून लावण्यात आले होते. त्यामध्ये चितळ येऊन अडकला असता याची माहिती वनविभागाला देणे अपेक्षित असताना त्याला मारून त्यापासून मांस तयार केल्याचा गुन्हा आरोपीने कबूल केला. वनपथकाने त्याच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत प्रकरण नोंदवून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ शेतात-
गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात पाणवठे नसताना वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ शेतातील आणि गावाशेजारी तहान शमविण्यासाठी येत असतात. पिकांची नासाडी टाळण्यासाठी शिवाराला जिवंत वीज तारेचे कुंपण अथवा फास लावले जातात. अशाच प्रकारात वन्यजीव अडकून असे गुन्हे घडतात.