गडचिरोली - गुरुवारी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानात शेकडो नागरिकांची उपस्थिती होते. निर्विकार चेहऱ्याने बसलेल्या प्रत्येकाची नजर शून्यात होती. रात्रीपासून सतत ओघळणारे अश्रू आणि ओला झालेला पदर. त्या मैदानावर घुमत होता तो फक्त ऐन तारुण्यात विधवा झालेल्या महिलांचा आक्रोश. ज्यांच्या खांद्यावर स्मशानात जायचे होते, आता त्याच पोराला खांद्यावर न्यावे लागेल, या कल्पनेने शहारलेल्या वृद्ध माता-पित्यांचा आक्रोश. यानंतर आपला बाप दिसणार नाही म्हणून धड समजही न आलेल्या लहान बालकांचा आक्रोश.
संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिनी पोलीस जवानांचा सत्कार केला जात होता. मात्र, याचवेळी गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसाठी दुःखद घटना घडली. नक्षलवाद्यांनी कोरची-कुरखेडा मार्गावरील जांभूळखेडा लगतच्या नाल्यावर घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले. ही घटना कानावर येताच अनेकांच्या काळजाचे ठोके चुकले.
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर आयोजित विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष गडचिरोलीतील घटनेकडे लागून होते. वीरमरण आलेल्या जवानांचे पार्थिव बुधवारी रात्री उशिरापर्यंत गडचिरोली येथे आणण्यात आले. ही घटना कानावर पडताच जवानांच्या कुटुंबीयांची निर्जीव अवस्था झाली. सर्व जवानांचे कुटुंबीय बुधवारीच गडचिरोली पोलीस मुख्यालयात दाखल झाले. मात्र, पोलीस विभागाने पूर्ण सोपस्कर पार पडल्याशिवाय मानवंदना दिली नाही. त्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत हुतात्मा जवानांचे कुटुंबीय आपल्या लाडक्या मुलाला, पतीला, बापाला, पाहण्यासाठी टाहो फोडत होते. हे चित्र पाहून वीरमरण आलेल्या जवानांना मानवंदना देण्यासाठी पोलीस मुख्यालयात दाखल झालेल्या शेकडो गडचिरोलीकरांचे काळीज पिळवटून टाकत होते.
कुणाचा भाऊ गेला तर कुणाचा बाप हरवला. कुणाचा म्हातारपणातील आधार हरपला तर कुणाला आयुष्यातील या वळणावर पती सोडून गेल्याने दुःख होत होते. या दुःखी जणांचे सांत्वन करताना अश्रू पुसता पुसता नातेवाईकांचाही पदर ओला होत होता. मन हेलावून टाकणारे हे चित्र गडचिरोलीकरांनाही पिळवटून टाकत होते.