गडचिरोली - राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने 'माझी वसुंधरा' या अभियानांतर्गत देण्यात येणारी हरित ई-शपथ (ई-प्लेज) शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दूरदृश्यप्रणालीव्दारे दिली. सर्व जिल्ह्यात नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह जिल्हाधिकारी कार्यालयात हरित शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री यांनी अभियानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले व हरित शपथ दिली.
पर्यावरण रक्षणासाठी अभियानात सहभागी व्हा- एकनाथ शिंदे
माझी वसुंधरा अभियान वातावरणीय बदलांमूळे झालेले नुकसान भरुन काढण्यास मदत करेल. वातावरणीय बदल हे देशापूरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला त्याने ग्रासले आहे. आपण भौतिक प्रगती साधत असताना दुसरीकडे आपण राहत असलेल्या आपल्या वसुंधरेचे अस्तित्व धोक्यात येत आहे. यावेळी निसर्गाकडून घेत असताना त्याला आपण देणेही लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे आणि याच आधारावर माझी वसुंधरा अभियानाची आखणी करण्यात आली आहे.
निसर्गाच्या, पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोक एकत्र आले पाहिजेत. अभियान ही लोकचळवळ उभी करण्यासाठीचा एक मार्ग आहे. परंतु ही चळवळ शासनाच्या किंवा सरकारपूरती मर्यादित राहता कामा नये. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मांडलं. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी यामध्ये खुप मोठी संधी आहे. यात सहभागाविषयी काही निकष असले तरी या जबाबदारीची जाणीव घेवून एक कर्तव्य म्हणून या अभियानाकडे सर्वांनी पहावे, असे ते पुढे म्हणाले.
माझी वसुंधरा-हरित शपथ घेण्याचे आवाहन -
या अभियानात 1 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात हरित ई शपथ देण्यात आली. नागरिकांनीही माझी वसुंधरा या अभियानाच्या www.majhivasundhara.com या संकेतस्थाळावर जावून ऑनलाईन ई शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर हरित शपथ घेतलेल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्रही मिळणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी या चळवळीत योगदान देवून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी जी. एम. तळपाडे, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, कल्पना निळ-ठुबे व इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा - गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद
हेही वाचा - गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आठवडाभरातील दुसरी घटना