गडचिरोली - कोरोनामुळे भामरागड तालुक्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्याप वर्ग सुरू झालेले नाहीत. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सक्त मनाई होती. मात्र, आता त्यांना शिक्षणासोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व प्रत्येक विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करता यावा यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडचे प्रकल्पाधिकारी मनुज जिंधल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नदी नाले पार करत आहेत. पायी चालत, सायकल, मोटारसायकल अशा शक्या त्या माध्यमांनी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्यांना पुस्तकाचे वाटप करीत आहे.
कोविड-19 च्या संसर्गामुळे शहरी भागात ऑनलाईन पद्धतीने थोड्या प्रमाणात शिक्षण सुरू झाले असले तरी सर्व विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेणे शक्य नाही. भामरागड सारख्या अतिदुर्गम डोंगराळ भागात ऑनलाईन शिक्षण ही फक्त संकल्पनाच आहे. भामरागड एटापल्ली तालुक्यातील गावात बीएसएनएल नेटवर्क नाही. काही गावांमध्ये तर विद्यूत पुरवठा नाही. आर्थिक परिस्थिती हालाकीची असलेल्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देणे या भागात शक्य नाही.
शिक्षणाची आवड कमी होऊ नये म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तर्फे विद्यार्थ्यांना कार्य पुस्तिका, शैक्षणिक खेळ व शैक्षणिक कार्डचे वाटप करण्यात येत आहेत. कार्यपुस्तिका ही इयत्ता ३ री ते ६ वी व ७ ते १० वी अशा दोन विभागात आहे. कार्डमधील चित्र ओळखण्यासाठी इंग्रजी, मराठी आणि माडीया भाषेतही कार्ड तयार कले आहे. या महत्वाचे उपक्रम प्रकल्पाधिकारी मनुज जिंदल, सहायक प्रकल्पाधिकारी धीरज मोरे यांच्य मार्गदर्शनाखाली शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करून अभ्यास करण्याचा सल्ला देत आहेत. तसेच सर्व कुटुंबाला कोरोनाविषयी मार्गदर्शन करीत आहेत.
लॉकडाऊन काळात अशा प्रकारच्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आदीवासी विद्यार्थी शिक्षणाशी जोडून राहतील व विद्यार्थ्यांना याचा फायद नक्की होईल, असा विश्वास प्रकल्पाधिकारी मनुज जिंधल यांनी व्यक्त केला.