गडचिरोली- जिल्ह्यातील अहेरी तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. पावसाळ्यात येथील धबधबे ओसांडून वाहतात. त्यातलाच एक म्हणजे कमलापूर हत्तीकॅम्प परिसरातील निसर्गरम्य धबधबा. खूप उंचावरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. त्यामुळे, हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची एकच गर्दी होत असते. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळ येथे बाहेरच्या पर्यटकांची गर्दी होत नसली, तरी स्थानिक नागरिक या धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.
कमलापूर हे राज्यातील एकमेव शासकीय हत्तीकॅम्प आहे. या ठिकाणी ९ हत्ती बघायला मिळतात. कमलापूरला राष्ट्रसंतांची नगरी म्हणूनही ओळखले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी याठिकाणी स्वतः येऊन १९५८ ला श्री गुरुदेव आश्रम शाळेची निर्मिती केली होती. त्यामुळे, या ठिकाणी आजही शाळा आणि प्रार्थना मंदिर आहे. ही महाराष्ट्रातील पहिली आश्रम शाळा आहे. एवढेच नव्हेतर, महाराष्ट्रातील दुसरे राखीव क्षेत्र कोलामार्का हे देखील गडचिरोलीत असून तेही प्रसिद्ध आहे. याठिकाणी रानम्हशी सोबतच विविध प्राणी बघायला मिळतात. तर, नामशेष होणाऱ्या पक्षांच्या यादीतील गिधाडांचे अस्तित्वसुद्धा याच ठिकाणी कायम आहे. त्यामुळे, कमलापूर या गावाला एक वेगळी ओळख असून याठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे कमलापूर परिसरातील धबधबे खळखळून वाहू लागले आहेत. मात्र, कोरोनामुळे सध्या पर्यटन क्षेत्र बंद असल्याने बाहेरच्या पर्यटकांना याठिकाणी भेट देता येत नसली तरी पावसाळ्यात खळखळणारा धबधबा बघण्यासाठी स्थानिकांची एकच गर्दी होताना दिसत आहे.
हेही वाचा- गडचिरोली जिल्ह्यात पुराचे थैमान; भामरागडमध्ये 200 घरांमध्ये शिरले पाणी