गडचिरोली - एसटी आगाराच्या 18 बसगाड्या आरटीओ पासिंगसाठी चंद्रपूरला पाठवण्यात आल्यामुळे अनेक मार्गावरील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी गडचिरोली आगारात शेकडो प्रवासी खोळंबले.
गडचिरोली एसटी आगाराकडे 103 बसगाड्या आहेत. यामध्ये मानव विकास मिशनच्या 49 बसगाड्या, दोन एशियाड आणि 51 लालपरी बसगाड्या आहेत. यापैकी 18 बसगाड्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या. त्यामुळे शुक्रवारी अनेक मार्गावरील बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. मात्र, याबाबत प्रवाशांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक प्रवासी आगारात ताटकळत बसची प्रतीक्षा करताना संताप व्यक्त करीत होते.
हे ही वाचा - गडचिरोलीत महिलांकडून दारूसाठा नष्ट; साहित्याची होळी
आगाराकडे 182 चालक, 194 वाहक, 30 कार्यालयीन कर्मचारी तसेच 62 यांत्रिक कर्मचारी आहेत. मात्र, त्या तुलनेत दररोज 120 च्या जवळपास फेऱ्या सोडल्या जात असल्याने मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यातच 18 बसगाड्या आरटीओ पासिंगसाठी तसेच चार ते पाच बसगाड्या नादुरुस्त असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. आवश्यक त्या ठिकाणी बसगाड्या सोडल्या जात आहे. अशी माहिती आगाराचे व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी दिली.
हे ही वाचा - गडचिरोलीत मुसळधार पाऊस; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा