गडचिरोली : युरिया खताची टंचाई निर्माण झाल्याचे भासवून जिल्ह्यात युरिया खताची जादा दराने विक्री केली जात आहे. जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी रविवारी विशेष मोहीम राबवून कृषी केंद्रांवर छापे टाकले व ज्या शेतकऱ्यांकडून ज्यादा दर आकारून खतविक्री करण्यात आली, त्यांना अधिकची रक्कम परत देण्यास कृषी केंद्रचालकास भाग पाडले.
सध्या धान, कापूस पिकाला युरिया खताची अत्यंत गरज आहे. त्यामुळे युरीया खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांमध्ये गर्दी होत आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रचालक युरिया खताची टंचाई भासवून पन्नास ते शंभर रुपये अधिक दर आकारत आहेत. रविवारी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे चामोर्शी तालुक्याच्या दौऱ्यावर जात असताना, काही शेतकरी युरिया खत खरेदी करून नेताना त्यांना दिसले, तेव्हा त्यांनी वाहन थांबवून शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता एका बॅगसाठी पन्नास ते शंभर रुपये अधिक दर तसेच खत खरेदी केल्यानंतर कोणतीही पावती दिली नसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. तेव्हा त्यांनी लगेच येवली येथील कृषी केंद्रावर छापा टाकला.
कृषी केंद्रावर चौकशी केली असता अनेक शेतकऱ्यांकडून जादा दराने खत विक्री केल्याचे आढळले. तेव्हा त्या सर्व शेतकऱ्यांना बोलावून अधिकचे पैसे परत करण्यास कृषी केंद्र संचालकास भाग पाडले. अशाच प्रकारे इतरही गावात त्यांनी छापे टाकून कृषी केंद्रावर युरिया खताच्या स्टॉकची पाहणी केली व शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार विक्री करण्याचे आदेश दिले. जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द करण्याचा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.
युरिया खताचा काळाबाजार होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सहाशे कृषी केंद्रांवर निगराणी ठेवण्यासाठी तीनशे कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कृषी सहाय्यक प्रत्येकी दोन कृषी केंद्रांना भेटी देऊन तेथील युरिया खताचा स्टॉक व वाजवी दराने विक्री होत आहे की नाही, याची दरदिवशी चौकशी करणार आहेत. कोणत्याही कृषी केंद्र चालकाने जादा दर आकारल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
हेही वाचा - कोरोना काळात बेजबाबदार वागणाऱ्यांना दणका; भामरागडमध्ये चार दिवसांत 27 हजारांचा दंड वसूल